कोट्टयम : केरळमध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर हल्ले सुरुच ठेवले, तर त्याचे वाईट परिणाम होतील असा इशाराच केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून केरळमध्ये भाजप आणि कम्युनिस्ट पक्षातील तणाव वाढला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या घरावही हल्ले झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये केरळमध्ये 80 जणांची हत्या झाली आहे. याचं राजकीय प्रत्युत्तर दिले जाईल असं नायडू यांनी म्हटलं आहे.
केरळमध्ये काय सुरु आहे हे सगळ्यांना दिसत आहे, तुमच्यात जर हिंमत असेल, तर आमच्याशी राजकीय मैदानात आणि वैचारिक पातळीवर लढा असा इशारा नायडूंनी दिला आहे. देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यात असलेली प्रचंड दरी ही काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांचा परिणाम असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष दिल्लीत एकत्र असतात आणि केरळमध्ये एकमेकांच्या विरोधात लढतात.
नोटाबंदीच्या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले. पण काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाने याला विरोध केला. देशातील काळापैसा पुन्हा मुख्य प्रवाहात आणायचा होता. या निर्णयापूर्वी हा पैसा लपवून ठेवला होता, त्याचा काहीही हिशोब नव्हता. आता हा सगळा पैसा बँक व्यवस्थेत दाखल झाला असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे.