मुंबई : गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला चुकून सीमापार करुन पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची अखेर सुटका करण्यात आली. मात्र पाकिस्तानात त्यांच्यावर जो काही अत्याचार करण्यात आला त्याची कहाणी वाचून तुमच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाहीत.
पाकिस्तानातून चंदूची २१ जानेवारीला सुटका करण्यात आली. चंदूचे भाऊ भूषण यांनी मुंबई मिररला या अत्याचाराची माहिती दिली. भूषण यांनी सांगितले की पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चंदूचा अतोनात छळ केला. चंदूला कधीही झोपू दिले जायचे नाही. तसेच त्यांना संपूर्ण अंधाऱ्या खोलीत ठेवले जायचे.
चंदू यांना पाकिस्तानात ताब्यात घेतल्यानंतर २१ जानेवारीला त्यांना वाघा सीमेवर पहिल्यांदा प्रकाश दिसला. चंदू यांना सातत्याने ड्रग्स दिले जात तसेच चौकशीही केली जात असते, असेही पुढे भूषण म्हणाले. चंदू यांना वारंवार ड्रग्स दिल्याने त्यांची मानसिक संतुलन ढासळलेय. त्यांना सतत मारले जात असे. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून एका कँपमधून दुसऱ्या कँपमध्ये नेले जात असे.
यामध्ये त्याच्या हाताचा अंगठाही तुटला. तसेच गुडघ्यालाही जखम झाली. चंदू यांना आपल्या सुटकेची आशा होती. जेव्हा त्यांना वाघा सीमेवर आणण्यात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा प्रकाश पाहिला. तेव्हा आपल्याला भारताच्या ताब्यात दिले जातेय असे कळले.
भूषण यांचे दाद चिंदा पाटील यांच्या माहितीनुसार, चंदू यांची परिस्थिती सामान्य आहे मात्र त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेय. त्यांना पूर्वस्थिती येण्यास काही कालावधी लागेल. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या आग्रहास्तव सोमवारी सैन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूषण आणि चिंदा पाटीला यांना अमृतसरमधील सैन्य रुग्णालयात चंदू यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.