`काँग्रेसनं मोदींच्या नावानं मुस्लिमांना घाबरवू नये`

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधातील वातावरण आपल्या बाजुला वळवण्यासाठी सुरु असलेल्या काँग्रेसच्या प्रयत्नांवर ‘जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद’ या संघटनेचे प्रमुख सय्यद महमूद मदनी यांनी जोरदार टीका केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 15, 2013, 03:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधातील वातावरण आपल्या बाजुला वळवण्यासाठी सुरु असलेल्या काँग्रेसच्या प्रयत्नांवर ‘जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद’ या संघटनेचे प्रमुख सय्यद महमूद मदनी यांनी जोरदार टीका केलीय.
मुस्लिम जनतेचं समर्थन मिळवण्यासाठी आणि त्यांची मतं सुरक्षित करण्यासाठीच काँग्रेस नरेंद्र मोदींचं भय लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मदनी यांनी केलाय. जयपूरमध्ये बिर्ला ऑडिटोरियममध्ये रविवारी मुस्लिम आरक्षणाच्या मागणसंबंधी विषयावर बोलताना काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी, मुस्लिम जनतेला मोदींच्या नावावरून अकारण भय वाटण्याचं काही कारण नाही, असं म्हटलंय.
आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेची मूळं खूप घट्ट झालीत त्यामुळे सांप्रदायिक ताकद सामान्य जनतेच्या हृदयात कधीही स्थान मिळवू शकणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
मुस्लिम जनतेत मोदींच्या नावाचं भय निर्माण करून २०१४ च्या निवडणुकीत मतं मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. भाजपचे उमेदवार मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले तरी मुस्लिम जनतेला घाबरण्याचं काही एक कारण नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. काँग्रेसनं कुणाच्या नावाचं भय निर्माण करून मुस्लिम जनतेची मतं मिळवण्यापेक्षा समुदायाच्या भल्यासाठी काम करावं, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिलाय.
दरम्यान, ‘जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद’ संघटनेनं भारतात मुस्लिम समुदायाला सगळ्यात पिछाडीवर असलेला समुदाय सांगत कमीत कमी १० टक्के आरक्षण मिळावं, अशी मागणी केलीय.

दोन वर्षांपूर्वी मोदींची स्तुती केली म्हणून मौलाना गुलाम अहमद वस्तानवी यांना दारुल उलूम देवबंद च्या व्हीसी पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं... कारण, त्यावेळी मदनी आणि त्यांच्या समर्थकांनीच वस्तानवी यांच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.