www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जम्मूमध्ये झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी एका फारशा माहित नसलेल्या दहशतवादी गटाने घेतलीय. या गटाचं नाव ‘शोहेदा ब्रिगेड’ असं आहे. हा गट फारसा कोणाला माहित नाही. या गटाचा प्रवक्ता सामी उल हक नावाच्या एका इसमाने याबाबत माहिती दिलीय.
‘आमच्या गटाच्या मुजाहिद्दीनने हा हल्ला केलाय. आमचे मुजाहिद्दीन अजूनही तिथे लढत आहेत’ असं त्यानं म्हटलंय. आमचे सर्व मुजाहिद्दीन लोकल आहेत असंही तो म्हणालाय. अर्थात, या गटाने ही जबाबदारी स्विकारली असली तरीही या हल्ल्यांमागे ‘लष्कर ए तोयबा’चा हात असल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केलाय. हल्ल्यांबाबतची मोडस ऑपरेन्डी ‘लष्कर ए तोयबा’शी मिळती जुळती असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
जम्मू काश्मिरमध्ये आज सकाळी दहशतवाद्यांनी एका तासात दोन मोठे हल्ले केले. सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लष्करी जवानांच्या पोशाखात आलेल्या दहशतवाद्यांनी कथुआच्या हीरानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्यांनी सुरूवातीला एक हँड ग्रेनेडचा स्फोट करून फायरींगला सुरूवात केली. या हल्ल्यात आत्तापर्यंत बारा जणांचा मृत्यू झालाय. आर्मीच्या एका लेफ्टनंट कर्नलसह दोन जवान शहीद झालेत तर कथुआमध्ये चार पोलीस शहीद झालेत. याशिवाय दोन नागरिकही ठार झालेत. यात एक दुकानदार आणि एक ट्रक क्लिनर यांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे जम्मू पठाणकोट हायवे सील करण्यात आलाय. अजूनही फायरींग सुरूच असल्याचं समजतंय.
पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट या आठवड्यात होणार आहे. त्याआधी हल्ला करून चर्चेत खोडा अडथळा आणण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.