कोच्ची : केरळमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहिल्याने सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यामध्ये एका महिलेचा समावेश असून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांवर कारवाई करण्यात आली होती. काही वेळाने पोलिसांनी या सर्वांना तंबी देऊन सोडून दिले.
केरळमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात प्रत्येक चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत लावले जाते. यादरम्यान उपस्थित असलेली मान्यवर मंडळी उभे राहत नाहीत अशी तक्रार भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी पोलीस महासंचालकांना केली होती.
भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांमधील वृत्तांचा दाखला दिला होता. पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार सोमवारी एका महिलेसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.