नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे विद्यार्थी नेते उमर खालिद आणि अर्निबन भट्टाचार्य यांनी तीन मागण्या केला आहेत. यात सिगारेटचे पाकिट, न्यूजपेपर आणि विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसोबत आरके पुरम पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात यावं, अशा तीन मागण्या या दोघांनी केल्या आहेत. तसेच खालिदचा अल्लाच्या अस्तित्वावर विश्वास नाही, असा दावा उमर खालिदच्या बहिणीने केला आहे.
खालिद आणि अर्निबन यांनी काल जेवणाबाबत केलेल्या मागणीने पोलिस मात्र चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी दोघांना जेवणाबाबत विचारले होते. तेव्हा दोघांनी सांगितले, की जेएनयूबाहेर असलेल्या धाब्याहून आम्हाला बिर्याणी आणि मोमोज आणून द्या. बऱ्याच दिवसांपासून बिर्याणी खाल्ली नाही. पण त्यांची मागणी अमान्य करण्यात आली. त्यांना पोलिस स्टेशनबाहेर असलेल्या खानावळीतून जेवण देण्यात आले.
शरण येण्यापूर्वी अखेरची सिगारेट घेतली होती, असे खालिदने सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खालिद नियमित सिगारेट ओढतो. पण पोलिसांनी त्याची सिगारेट देण्याची मागणी धुडकावून लावली आहे.
खालिदही बहिण कुलसुम फातिमा म्हणाली, की तो स्वतःला मार्क्सवादी समजतो. आमचे कुटुंब प्रचंड धार्मिक आहे. पण तो मात्र नास्तिक आहे. त्याचा अल्लाच्या अस्तित्वावर विश्वास नाही. तो या विषयावर खुप प्रश्न विचारतो. पण तो एक चांगला माणूस आहे. तो कधीही चुकीचे काही करु शकत नाही.
विद्यापीठाच्या आवारात फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात देश विरोधी घोषणा दिल्याचा खालिद आणि अर्निबन यांच्यावर आरोप आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. कन्हैया कुमारही सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.