www.24taas.com, नवी दिल्ली
आर्थिक संकटात सापडलेल्या खाजगी विमान कंपनी ‘किंगफिशर एअरलाइन्स’चं उड्डाण लायसन्स निलंबित करण्यात आलंय. लायसन्स वैधतेची तारीख उलटल्यानं आता हे लायसन्स निलंबित झालंय. लायसन्सच्या नियमित नुतनीकरणाची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती.
किंगफिशरच्या उड्डाणाची शक्यता मावळल्यानं कंपनीच्या शेअर्समध्येही मोठा उतार सोमवारी जाणवला. किंगफिशरनं मागच्याच आठवड्यात महानिर्देशालयाकडे शेड्युल्ड ऑपरेटर्स परमिटसाठी (एसओपी) अर्ज केला होता. त्यानंतर पुन्हा विमान उड्डाण सुरू करण्यासाठी योजना बनवण्यासाठी पैसे कसे उभारले जातील, अशी विचारणा नागरिक उड्डाण महानिर्देशालयाकडून कंपनीला करण्यात आली होती. यावर समाधानकारक उत्तर काही मिळू शकलं नव्हतं.
मासिक ठराविक वेतन न मिळाल्यानं कर्माचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर एक ऑक्टोबरपासून किंगफिशरच्या विमानांचं उड्डाण रखडलं होतं. कंपनी पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी ६.५२ अरब रुपयांची आवश्यकता आहे. सध्या या कंपनीवर ७,५२४ करोड रुपयांचं कर्ज आहे तसचं आत्तापर्यंत किंगफिशरला ८,००० करोड रुपयांचं नुकसान सोसावं लागलंय. नुकतंच, कर्जदात्यांनी कंपनीचा प्रमोटर विजय माल्ल्या यांची बँकेच्या गँरंटीची मागणीदेखील धुडकावून लावलीय. यावेळी विजय माल्ल्या यांनी फ्रेबुवारीपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १०५ करोड रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही म्हटलं होतं. पण, त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यानंतर त्यांनी अबुधाबीची विमान कंपनी ‘एतिहाद एअरवेज’कडून काही गुंतवणूक मिळवण्याचे प्रयत्न केले पण तेही असफल ठरले.