मोदी सरकारनं केल्या केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या...

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारमधील मंत्रालयांतील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Updated: Jan 29, 2016, 05:28 PM IST
मोदी सरकारनं केल्या केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या...  title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारमधील मंत्रालयांतील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सरकारने काढलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

दूरसंचार खात्याचे सेक्रटरी राकेश गर्ग यांना सोमवारी अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या सचिव पदावर पाठवण्यात आले. त्यांच्या निवृत्तीला दहा महिने असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यांच्याऐवजी जे एस दीपक यांना दूरसंचार खात्याच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. ते उत्तर प्रदेशचे कॅडरच्या १९८२ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

गर्ग हे १९८० च्या बॅचचे अधिकारी असून अमरेंद्र सिन्हा यांच्याकडे असलेला अधिभार त्यांना देण्यात आला आहे. गर्ग यांना इतक्या महत्त्वाच्या मंत्रालयातून का बदली करण्यात आले, याची माहिती मिळालेली नाही. गर्ग यांना जुलै २०१४ मध्ये दूरसंचार खात्याचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

मध्यप्रदेशमधील अधिकारी अरुणा शर्मा यांना इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जवळपास १० खात्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

कृष्ण कुमार जालान जे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभागातील आयुक्त आहेत त्यांना कामगार व रोजगार मंत्रालयाचे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

शोभना पट्टनायक यांना कृषी मंत्रालयात कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागात सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अविनाश के श्रीवास्तव जे १९८२ च्या बॅचचे अधिकारी आहेत त्यांची अन्न प्रक्रिया मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

विनोद अग्रवाल जे सध्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सचिव आहेत त्यांची अपंग विकास आणि सबलीकरण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.