नवी दिल्ली : रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांसाठी स्वस्तामध्ये आरओचं स्वस्तामधलं पाणी उपलब्ध करुन द्यायच्या योजनेला सुरुवात झाली आहे. या योजनेचाच भाग म्हणून नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 16 वर एक वॉटर वेंडिग मशीनही बसवण्यात आलं आहे. पुढच्या आठवड्यापासून हे मशिन सुरु होणार आहे.
या योजनमुळे प्रवाशांना 5 रुपयांमध्ये एक लीटर पाणी मिळेल, पण या पाण्यासाठी प्रवाशांना आपलं भांड किंवा बाटली घेऊन यावी लागणार आहे. तर बाटलीसोबत एक लिटर पाणी हवं असल्यास प्रवाशांना 8 रुपये मोजावे लागणार आहेत.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी बजेटमध्ये प्रवाशांना आरओचं पाणी उपलब्ध करुन द्यायची घोषणा केली होती. त्यानुसार आता पुढच्या 2 महिन्यांमध्ये ए1, ए, बी, आणि सी दर्जाच्या रेल्वे स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध होईल. त्यासाठी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर 4,500 वॉटर वेंडिग मशिन लावली जाणार आहेत.