www.24taas.com,नवी दिल्ली
तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममताना आर्थिक सुधारणांचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी कल्पना दिली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.
शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानांनी ममतांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु ममतांनी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पंतप्रधानांनी कालही ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला होता. पंतप्रधानांच्या कार्यालयातून तसा दूरध्वनीही करण्यात आला होता. मात्र, ममतांच्या कार्यालयातून प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) समन्वय समितीच्या २२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधांनांनी सुधारणांचे सूतोवाच केले होते. त्या बैठकीला तृणमूलचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीच्या सुरवातीलाच पंतप्रधानांनी १७ मुद्द्यांची यादी सांगितली. त्यात रिटेल आणि नागरी हवाई वाहतुकीमध्ये थेट परकी गुंतवणुकीच्या मुद्द्यांचा समावेश होता.
अर्थव्यवस्था अडचणीत असल्याने डिझेल दरवाढीचा निर्णयही घ्यावा लागेल, असेही पंतप्रधानांनी त्याबैठकीत सांगितले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्याऐवजी पंतप्रधानांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची भूमिका त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी मांडल्याचेही सूत्रांनी सांगितले.