स्पीड पोस्ट आणि जाहिरात देऊन ट्रिपल तलाक

ट्रिपल तलाक देण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत.

Updated: Apr 6, 2017, 07:29 PM IST
स्पीड पोस्ट आणि जाहिरात देऊन ट्रिपल तलाक title=

कानपूर : ट्रिपल तलाक देण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. कानपूरमध्ये स्पीड पोस्टने तलाक दिल्याची तर हैदराबादमध्ये वर्तमानपत्रात जाहीरात देऊन ट्रिपल तलाक दिलाय.

कानपूरमध्ये एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीने स्पीड पोस्ट पत्राद्वारे ट्रिपल तलाक लिहून सोडचिठ्ठी दिलीय. आलिया सिद्दीकी असं या महिलंचं नाव आहे.. चार महिन्यांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. नासिर खान नावाचा तिचा पती असिस्टंट लेबर कमिशनर असून त्याचं हे दुसरं लग्न होतं. याप्रकरणी आता आलिया सिद्दीकी हिनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितलीय.

या दोघांनाही तिनं ट्विट करुन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केलीय. आपला पती सरकारी अधिकारी असून त्याने दोन विवाह केलेत. आता त्यानं स्पीड पोस्ट करुन ट्रिपल तलाक दिल्याची माहिती तिनं या ट्विटमध्ये नमूद केलीय. सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तिनं म्हटलंय. याप्रकरणी न्याय मिळावा अशी अपेक्षाही तिनं यांत व्यक्त केलीय.