नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारची हत्या करण्याला ११ लाख रुपये देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी आदर्श शर्मा या व्यक्तीने केली होती. मात्र या व्यक्तीच्या बँकेच्या खात्यात केवळ १५० रुपये असल्याची माहिती आता समोर आलीये.
"'जनेविविसं'चा अध्यक्ष कन्हैया कुमार याला जी व्यक्ती गोळी घालेल त्या व्यक्तीला ११ लाख रुपयांचे बक्षीस पूर्वांचल सेनेतर्फे दिले जाईल," असा मजकूर असलेले फलक दिल्लीतील काही भागात लागले होते. पूर्वांचल सेनेचा अध्यक्ष आदर्श शर्मा याचे त्या फलकांवर नाव होते.
पण, त्याच्या बँकेच्या खात्यात मात्र केवळ १५० रुपयांची रक्कम असल्याची आता माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर तो दिल्लीतील रोहिणी परिसरात एका भाड्याच्या घरात राहतो. त्याने त्या घरमालकाला अनेक महिन्यांचे भाडे दिलेले नाही. हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राने घेतलेल्या शोधात ही माहिती पुढे आली आहे.
'आदर्श शर्माचा उत्पन्नाचा स्रोत तसा काहीच नाही. तो त्याच्या मित्रांकडून पैसे घेऊनच स्वतःची उपजिविका करतो आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात काम करुन देण्याचे आश्वासन देऊन तो लोकांकडून ५०० रुपये घेत असे,' असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या आदर्शचा मोबाईलही त्याने बंद करुन ठेवला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी बागुसराई या त्याच्या बिहारमधील मूळ गावी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे.