www.24taas.com, बेळगाव
माणसांच्या जखमांवर मीठ चोळणा-या कर्नाटक सरकारला शनिवारी सणसणीत चपराक बसली. बेळगाव तालुका पंचायतीवर ‘मराठी झेंडा’ डोलाने फडकला. यावेळी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘राहणार तर महाराष्ट्रात नाही तर तुरुंगात’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी मराठी लोकांनी परिसर दणाणूण सोडला.
बेळगाव महापालिका बरखास्त करून शहराचे नाव बेळगावी करून येथील मराठी माणसाला डिवचण्यात आले होते. एकीकरण समितीतील फुटीमुळे काही वर्षे येथे सत्ता गमवावी लागली होती. मात्र पुन्हा सत्ता मिळाल्याने बेळगाव तालुक्यातील मराठीबांधव आनंदीत आहेत.
बेळगाव तालुका पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी सकाळी झाली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रताप कोळी यांनी बाजी मारली. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर समितीच्याच रिता बेळगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
काँग्रेसचे नऊ सदस्य आणि दोन अपक्ष सदस्य या निवडणुकीला उपस्थित न राहिल्यामुळे एकीकरण समितीला विजय मिळवता आला. एकीकरण समितीच्या उमेदवारांना १५, तर भाजपच्या उमेदवाराला १४ मते मिळाली. एकूण ४० सदस्यांच्या पंचायतीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे १५, भाजपचे १४, काँग्रेसचे नऊ, तर दोन अपक्ष सदस्य आहेत.