www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांपुढं नवा `आदर्श` घालून दिलाय. कसलाही थाटमाट किंवा बडेजाव न मिरवता, अत्यंत साधेपणानं त्यांनी आपली लाडकी कन्या अंकिता आणि दिल्लीतील व्यावसायिक प्रखर भंडारी यांचं लग्न लावून दिलं. त्यांचा हा आदर्श भपकेबाज राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या पृथ्वीराजांच्या कन्येचा विवाह सोहळा राजधानी दिल्लीत पार पडला. साक्षात पृथ्वी`राजकन्ये`चा विवाह असूनही कोणताही थाटमाट, डामडौल किंवा बडेजाव इथं नव्हता. जेमतेम १५० लोकांच्या उपस्थितीत, कौटुंबिक वातावरणात ११, रेसकोर्स रोडवरील घरातच अत्यंत साधेपणानं हा विवाह संपन्न झाला.
आदर्श घोटाळ्यामुळं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावं लागल्यानंतर, दिल्लीश्वरांच्या आशीर्वादानं पृथ्वीबाबा मुख्यमंत्री झाले. दिल्लीतल्या राजकारणात मुरलेल्या पृथ्वीराजांकडं आऊटसायडर म्हणूनच पाहिलं जात होतं. बाबांना आपला जम बसवायला थोडा वेळ लागला, परंतु आता त्यांनी प्रशासनावर चांगलीच मांड ठोकलीय. राष्ट्रवादीलाही त्यांनी चांगलाच चाप लावला. आता मुलीच्या लग्नामध्ये वैयक्तिक डामडौल आणि भपकेबाजपणाला कात्री लावून त्यांनी नवा आदर्श घडवला.
साधा नगरसेवक आणि आमदार झाल्यानंतर गळ्यात सोन्याच्या चैनी, हातात अंगठ्या आणि पजेरो गाड्या घेऊन मिरवणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यात पृथ्वीबाबांनी हे झणझणीत अंजन घातलं. इथं आठवण झाली ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वेणूताईंची... कराडचेच सुपुत्र असलेले यशवंतराव आणि वेणूताईही अत्यंत साधेपणानं आयुष्य जगले... कराडकर पृथ्वीबाबांनीही आता तमाम राजकारण्यांना साधेपणाचा आदर्श घालून दिलाय.
राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य त्यांनी कायम वेगळं ठेवलं. त्यांची पत्नी सत्त्वशीला, कन्या अंकिता आणि पुत्र जय यांच्याबाबत मीडियात कधी शब्दही छापून आला नाही. पृथ्वीबाबांच्या कारभाराविरोधात बोंब ठोकणाऱ्या राजकीय नेत्यांनो, आमदार, खासदारांनो..., त्यांच्यापासून काहीतरी धडा घ्या.
मुख्यमंत्र्यांच्या घरच्या लग्नाला महाराष्ट्राच्या जनतेला आमंत्रण नव्हतं. तरीही तमाम जनता पृथ्वीबाबांची कन्या अंकिता हिला आशीर्वाद देतेय, ती पृथ्वीबाबांनी दाखवलेल्या या आदर्शामुळंच... ही पुण्याई भविष्यातील राजकीय वाटचालीत त्यांच्या कामी येणार आहे, एवढं नक्की.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.