www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशातील कार बनविणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मारुती सुझूकी’ कंपनीनं आपल्या १,४९२ गाड्या ग्राहकांकडून परत बोलावून घेतल्यात. या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात उप्तादन झालेल्या इर्टीग, स्वीफ्ट, डीझायर आणि ए-स्टार या मॉडल्सच्या गाड्यांच्या स्टिअरिंगमध्ये काही तांत्रिक समस्य़ा आढळल्याने या गाड्या परत बोलावण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय.
कंपनीनं परत बोलावलेल्या १४९२ गाड्यांमध्ये ३०६ इर्टीगा, ५९२ स्विफ्ट, ५८१ डिझायनर आणि १३ ए-स्टार गाड्यांचा समावेश आहे. ही मॉडेल्स १९ ऑक्टोबर २०१३ ते २६ ऑक्टोबर २०१३ या काळात उत्पादित करण्यात आल्या आहेत.
या परत बोलावण्यात आलेल्या गाड्यांच्या स्टिअरिंगमध्ये काही तांत्रिक बिघाड आढळल्यास कंपनी या गाड्यांचे स्टिअरिंगचा संपूर्ण भाग मोफत बदलून देणार आहे. स्टिअरिंगचा संपूर्ण भाग याआधीच डिलर्सच्या वर्कशॉपकडे पोहचवण्यात आलाय. याबद्दल सर्व ग्राहकांना माहिती देण्याची जबाबदारी ‘मारुती सुझूकी’ कंपनीचे डिलर्सकडे सोपवण्यात आलीय.
यापूर्वी, फेब्रुवारी २०१० मध्ये कंपनीनं अशाच मोठ्या प्रमाणात आपल्या काही गाड्या परत बोलावल्या होत्या. यामध्ये ‘ए-स्टार’ मॉडेलची जवळपास एक लाख युनिटस् परत बोलावण्यात आली होती. यामध्ये ‘फ्युएल पंप’मध्ये काही बिघाड आढळून आला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.