www.24taas.com, नवी दिल्ली
‘यूपीए’ समर्थन द्यायचं की नाही याबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षानं सर्वस्वी माझ्यावर सोपवलीय... पूर्ण विचाराअंतीच मी याबद्दल निर्णय घेईन’ असं बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मायावतींनी स्पष्ट केलंय. बसपा अध्यक्षा मायावतींनी यूपीए सरकारच्या समर्थनाबाबत पुनर्विचार सुरू केलाय. आज झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मायावतींनी ही माहिती दिलीय.
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावतींनी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा शक्तीप्रदर्शन केलं. हजारो कार्यकर्त्यांना पाहून जोशात आलेल्या मायावतीनी यूपीएच्या समर्थनाबाबत पुनर्विचाराचा इशारा दिला. एवढंच नव्हे तर मध्यावधी निवडणुकांचं बिगुलही वाजणार असल्याचं सकेत मायावतींनी दिले आहेत. आता यूपीएच्या सर्व नजरा टीकल्या आहेत बसपाच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या बैठकीवर... कारण घोटाळे आणि आर्थिक सुधारणांच्या मुद्यावर यूपीएचा गड हळूहळू पोखरला जातोय.
मायावती सध्या यूपीएला बाहेरून समर्थन देत आहेत. त्यामुळं त्यांनी सरकारला अत्यंत संयमित खेळी खेळत आहेत. घोटाळे आणि एफडीआयच्या मुद्यावर मायावती ममतांच्या पावलांवर पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसतंय. मायावतींनी समर्थन मागे घेतल्यास युपीए सरकार लगेचच धोक्यात येणार नाही. मात्र, एफडीआयच्या मुद्यावर डीएमकेची भूमिका डळमळीत असल्यानं सरकारच्या कुबड्या ढासळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं बदलत्या राजकीय परिस्थितीत मायावतींना फायदा दिसला तर त्या नक्कीच समर्थन मागे घेतील. मात्र, यासाठी आता यूपीए मायावतींना मनवण्यासाठी काय पावलं उचलणार? हा मोठा प्रश्न आहे.