नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना कोणत्याही परवानगीविना मीडियासमोर वक्तव्य केल्याणं महाग पडलंय. देवयानी यांना परदेश मंत्रालयाच्या विकास भागीदारी विभाग संचालक पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्यावर 'अनियमित काळासाठी' ही कारवाई केली गेलीय.
या कारवाईमुळे देवयानी खोब्रागडे या सेवेत तर राहतील पण, त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपविली जाणार नाही तसंच या प्रकरणात त्यांची चौकशीही होणार आहे.
भारतीय राजनैतिक अधिकारी असलेल्या देवयानी खोब्रागडे यांना गेल्या वर्षी यांना व्हिसा घोटाळा, खोटी माहिती देणे आणि घरातील महिला नोकरास अमेरिकेतील किमान वेतनापेक्षा कमी पगार दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे, खोब्रागडे यांना अमेरिकेने अटक केल्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
काही दिवसांपूर्वी त्यांनी एका न्यूज चॅनलला यासंबंधी एक मुलाखत दिली होती. विदेश मंत्रालयानं या त्यांच्या कृत्यावर बोट ठेवून खोब्रागडे यांनी ही मुलाखत देण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचं म्हटलंय.
याच वर्षी जानेवारी महिन्यात भारतात परतल्यानंतर देवयानी यांची परदेश मंत्रालयाच्या मुख्यालयात संचालक पदाच्या अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवयानी खोब्रागडे यांनी आपल्या मुलांचा अमेरिका पासपोर्ट असल्याची माहिती जाहीर केली नव्हती, यामुळे प्रशासन त्यांच्यावर नाराज होतं.
१९९९ बॅचच्या आयएफएस अधिकारी खोब्रागडे यांना त्यांच्या नोकर महिलेच्या व्हिजा अर्जात खोटी माहिती देण्याच्या आरोपात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना २.५ लाख डॉलर मुचलक्यावर सोडण्यात आलं होतं.
भारतीय राजनैतिक अधिकारी असलेल्या देवयानी यांची कपडे उतरवून चौकशी करण्यात आल्यानं आणि त्यांना इतर गुन्हेगारांसोबत तुरुंगात ठेवल्यानं भारतानं कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यामुळेच, भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.