केवळ लग्नासाठी 'इस्लाम'चा स्विकार अवैध : हायकोर्ट

केवळ लग्नासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार करणं अवैध असल्याचा महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परधर्मावर 'आस्था आणि विश्वास' असल्याशिवाय केवळ परधर्मीय व्यक्तीशी विवाह करण्याच्या एकमात्र उद्देशानं धर्मांतरण करणं, योग्य ठरवलं जाऊ शकत नाही. 

Updated: Dec 20, 2014, 11:54 AM IST
केवळ लग्नासाठी 'इस्लाम'चा स्विकार अवैध : हायकोर्ट title=

अलाहाबाद : केवळ लग्नासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार करणं अवैध असल्याचा महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय. हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परधर्मावर 'आस्था आणि विश्वास' असल्याशिवाय केवळ परधर्मीय व्यक्तीशी विवाह करण्याच्या एकमात्र उद्देशानं धर्मांतरण करणं, योग्य ठरवलं जाऊ शकत नाही. 

केवळ लग्नाच्या उद्देशानं केलेल्या धर्मांतरणाला हायकोर्टानं कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिलाय. न्यायमूर्ती एस. पी. केसरवानी यांच्या खंडपीठानं नूरजहाँ आणि इतर पाच याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय जाहीर केलाय.  

न्यायमूर्तींना आपल्या आदेशात २००० सालच्या एका आदेशाला अधोरेखित केलं. यामध्ये, मुस्लिम व्यक्तीचा इस्लाममध्ये विश्वास असल्याशिवाय केवळ लग्नाच्या उद्देशानं धर्मांतरण करणं निरर्थक असल्याचं म्हटलं होतं. यासाठी, त्यांनी पवित्र कुरानाचाही दाखला दिलाय. अशा प्रकारची लग्न पवित्र कुरानच्या सुरा दोन आयत २२१ मध्ये म्हटल्याच्या अगदी विरुद्ध असल्याचं, न्यायाधीशांनी म्हटलंय. 

याचिकाकर्त्या मुलींच्या म्हणण्यानुसार, त्यांना इस्लामबद्दल फारशी माहिती नाही. तसंच त्यांनी आपला 'अल्लाह'वर विश्वास आणि आस्था असल्याचंही म्हटलं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विवाह केलेल्या मुलांनी आपल्या पत्नींचं त्यांचं धर्मांतर केवळ लग्नाच्या उद्देशानं केलं.

याचिकाकर्त्या  विवाहीत जोडप्यांनी संरक्षणासाठी मागणी केली होती. हे लोक उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून आहेत. यातील, प्रत्येक प्रकरणामध्ये तरुण मुस्लिम आहेत तर मुली हिंदू... पण, केवळ निकाह करण्यासाठी या मुलींनी इस्लाम कबूल केलाय.  त्यामुळेच, या पाचही जोडप्यांनी दाखल केलेल्या याचिकाही रद्दबादल ठरवल्यात. 

कोर्टाच्या म्हणण्यानुसार, तुमचा धर्मावर विश्वास असेल तरच केवळ धर्मपरिवर्तन करणं योग्य आहे. पण, केवळ लग्नाच्या उद्देशानं केलेलं धर्मांतर अवैध आहे.

धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनीही केलं होतं धर्मांतर.. 
उल्लेखनीय म्हणजे, अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री यांनीही केवळ एकमेकांशी लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारत निकाह केला होता. हेमामालिनीच्या प्रेमात पडल्यानंतर अगोदरपासूनच विवाहीत असलेल्या धर्मेंद्र यांची मुलंही मोठी झाली होती... त्यांच्या पहिल्या पत्नीनं - प्रकाश कौर यांनी त्यांना घटस्फोट देण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे, हिंदू कायद्यानुसार हेमा-धर्मेंद्र यांना लग्न करणं शक्य नव्हतं.

त्यामुळे त्यांनी इस्लाम धर्मात प्रवेश करून दिलावर आणि आयशा अशी नावं धारण केली होती... त्यानंतर त्यांचा निकाह पार पडला... 

आज धर्मेंद्र दोन्ही कुटुंबांत सांसारिक जीवन जगत आहेत. प्रकाश कौर यांच्याच घरी ते आजही राहतात... पण, हेमामालिनी यांच्या घरी ते येऊन-जाऊन असतात. हेमामालिनी यांच्या मुली आहना आणि ईशा यांचे वडीलही धर्मेंद्रच आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.