नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी योजनेअंतर्गत (एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन- ईपीएफओ) किमान मासिक निवृत्ती वेतन 1,000 रुपये करण्याचा निर्णय येत्या एक सप्टेंबरपासून अंमलात आणला जाणार आहे. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सामावून घेण्यासाठी कमाल वेतनाची मर्यादाही १५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स अंतर्गत (ईडीएलआय) मिळू शकणारी कमाल रक्कमही सध्याच्या १.५६ लाखांवरून ३.६ लाखांवर नेण्यात आली आहे. निवृत्ती वेतनाचा लाभ २८ लाख कर्मचाऱ्यांना मिळेल. तर कमाल वेतन मर्यादाचा लभा अतिरिक्त ५० लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
'ईपीएफओ' सदस्याचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला ३.६० लाख रुपये विम्यापोटी मिळतील. याबाबतची अधिसूचना १ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याची घोषणा ईपीएफओचे सेंट्रल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर के. के. जालान यांनी केली. ज्या पेन्शनधारकांना सध्या एक हजार रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे, त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून किमान हजार रुपये पेन्शन मिळेल, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.