दोनदा बलात्कारानंतर जाळून घेतलेल्या ‘ती’चा मृत्यू!

एकाच आरोपीकडून दोन वेळा बलात्कार... आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याकडूनच तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार दिली जाणारी धमकी, अपमान... यामुळे रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून देणाऱ्या तरुणीचा अखेर मंगळवारी हॉस्पीटलमध्ये तडफडून मृत्यू झाला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 2, 2014, 11:19 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलकाता
एकाच आरोपीकडून दोन वेळा बलात्कार... आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याकडूनच तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार दिली जाणारी धमकी, अपमान... यामुळे रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून देणाऱ्या तरुणीचा अखेर मंगळवारी हॉस्पीटलमध्ये तडफडून मृत्यू झाला. यामुळे नागरिकांत प्रचंड संताप निर्माण झालाय.
एक महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यातील – बंगालमधील ही सुन्न करणारी घटना... गेल्या जुलै महिन्यात आपल्या कुटुंबीयांसोबत बिहारहून कोलकत्यात आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग दोन महिन्यांपूर्वी ओढावला होता. २५ ऑक्टोबर रोजी याच परिसरात राहणाऱ्या छोटू आणि त्याच्या पाच साथीदारांनी मध्यमग्रामच्या पाटूलीमधील शिवतल्ला भागात या मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी संबंधीत तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल केली होती. परंतु, वैद्यकीय चाचणीनंतर घरी परतलेल्या या मुलीचं आरोपींनी पुन्हा एकदा अपहरण करून तिच्यावर पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार केला. यानंतर पोलिसांनी छोटूसह सहा आरोपींना अटकही केली होती.
मुलीवर शारीरिक अत्याचार सहन न झाल्यानं या कुटुंबानं हे ठिकाण सोडलं आणि ते डमडम इथं राहायला गेले. तेव्हा तिथंही जाऊन आरोपींनी तक्रार मागे घेण्यासाठी या कुटुंबावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून संबंधित मुलीनं २३ डिसेंबर रोजी स्वत:ला जाळून घेतलं होतं. अखेर ३१ डिसेंबरच्या रात्री इतर सर्व जण नव्या वर्षाचं स्वागत करत असताना या मुलीनं अखेरचा श्वास घेतला.
टॅक्सी चालक असलेल्या मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात पोलिसांवर धमकीचा आरोप केलाय. पोलिसांकडून तसंच काही वजनदार लोकांकडून आपल्यावर हे ठिकाण सोडून जाण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणातले सगळे आरोप सध्या बाहेर मोकाट फिरत आहेत. या तरुणीच्या मृत्यूनंतर कोलकातामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांनी निदर्शन करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.