www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनानंतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मोठ्या मेहनतीनं आधार कार्ड मिळवलं असेल... पण, त्यातही चुका असल्यानं तुम्ही निराश झाला असाल तर थांबा... कारण, आधार कार्डवर असणाऱ्या चुका दुरुस्तीची प्रक्रियाही सुरु आहे.
शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता केंद्र शासनाच्या वतीने आधारकार्डची नोंदणी करण्यात येत आहे. बहुतांश नागरिकांच्या आधार कार्डावरील नोंदणीत चुका झाल्याचे समोर आले आहे. अशा नागरिकांना आधारवरील चुका दुरुस्त करता येणार आहेत. यासाठी तुमच्या शहरांमध्ये अनेक `महा ई-सेवा` केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. तसंच आधार नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केंद्र शासनाचे विविध योजनांचे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याकरिता संबधित नागरिकांचा आधार क्रमांक बँकेला देणे आवश्यक आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात नागरिकांनी आधार नोंदणीस मोठा प्रतिसाद दिला. मात्र, आधारबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. अनेक नागरिकांनी आधारसाठी नोंदणी करून वर्ष उलटले तरी आधार प्राप्त झालेले नाही. काही नागरिकांच्या आधार कार्डावर नाव, पत्ता, फोटो किंवा वयाच्या चुका झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना नेमकी तक्रार कोणाकडे करावी, आधारवरील चुका दुरुस्त होतील की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे.
मात्र, आता `महा ई-सेवा` केंद्रे तसेच सेतू कार्यालय तसेच आधार नोंदणी करणार्या कंपनीच्या कार्यालयात दुरुस्ती करता येणे शक्य आहे. यासाठी बायोमॅट्रिक आणि डेमोग्राफिक अशा दोन पध्दतीने या दुरुस्त्या करता येणार आहेत. दुरुस्ती करतांना संबधितांना पुरावा जोडणे बंधनकारक राहणार आहे. उदारणार्थ जन्मतारखेच्या नोंदीत चूक असल्यास संबधितास शाळा सोडल्याचा दाखला देणे बंधकारक राहणार आहे. चुका दुरुस्त केल्यानंतर साधारण महिनाभरानंतर आधार कार्ड प्राप्त होणार आहे. परंतु ही सेवा सशुल्क असणार आहे. यासाठी नागरिकांना १५ ते ३० रुपये शुल्क भरावे लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.