राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण : अक्षय कुमार, सोनम कपूर सन्मानित; मराठीचा बोलबाला

‘रुस्तम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तर मल्याळम अभिनेत्री सुरभी लक्ष्मीने ‘मिनामीनुनगु’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार मिळाला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2017, 09:56 PM IST
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण : अक्षय कुमार, सोनम कपूर सन्मानित; मराठीचा बोलबाला title=
Pic Courtesy: YouTube grab

नवी दिल्ली : ‘रुस्तम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तर मल्याळम अभिनेत्री सुरभी लक्ष्मीने ‘मिनामीनुनगु’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार मिळाला. त्यांना आज ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरविण्यात आले. यावेळी मराठीचा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकवला.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात करण्यात आले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री एम. वेंकय्या नायडु आणि केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोडही उपस्थित होते. 

सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शक जोडीच्या ‘कासव’ सिनेमाने ‘सुवर्णकमळ’ पटकावत पुरस्कारांची शर्यत जिंकली. तर ‘दशक्रिया’ सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा असे तीन-तीन पुरस्कार खिशात घातले आहेत. राजेश मापुस्कर यांना त्यांच्या ‘व्हेंटिलेटर’ या पहिल्याच मराठी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला असून याही सिनेमाने उत्कृष्ट संकलन आणि ध्वनी संकलनासाठीचे (साऊंड मिक्सिंग) तीन पुरस्कार पटकावत मराठीचा  बोलबाला होता.

अक्षयने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. आज मला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. माझा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही. तसेच शालेय जीवनात आलेले अपयश पचवून माझ्यातले सुप्त गुण ओळखणाऱ्या माझे आई- बाबांचेच हे श्रेय असल्याचे अक्षय म्हणाला.

पुरस्कार विजेत्यांची यादीः

– सर्वोत्कृष्ट सिनेमा- कासव (मराठी)
– सर्वोत्कृष्ट इंदिरा गांधी पदार्पण पुरस्कार- अलिफा
– सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावर भाष्य करणारा सिनेमा- पिंक, अनिरुद्धा रॉय चौधरी
– सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- धनक, नागेश कुकनूर
– सर्वोत्कृष्ट गायक- सुंदरा अय्यर, जोकर (तामिळ)
– सर्वोत्कृष्ट गायिका- इमान चक्रबर्ती, तुमी जाके भालोभाशो, प्राकतन
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजेश मापुस्कर, व्हेंटिलेटर
– सर्वोत्कृष्ट अभिनेता- अक्षय कुमार, रुस्तम
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सुरभी, मिनामीनुनगु
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, झायरा वसीम, दंगल
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मनोज जोशी- दशक्रिया
– सर्वोत्कृष्ट  संकलन- व्हेंटिलेटर
– सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सायकल (मराठी)
– सर्वोत्कृष्ट रि-रेकॉर्डिंग पुरस्कार- व्हेंटिलेटर, निर्मिती प्रियांका चोप्रा
– स्पेशल इफेक्ट- नवीन पॉल, शिवाय
– सर्वोत्कृष्ट कन्नड सिनेमाः रिझरव्हेशन
– सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाः नीरजा, राम माधवानी
– सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमाः बिसरजन, कौशिक गांगुली
– सर्वोत्कृष्ट तामिळ सिनेमाः जोकर, दिग्दर्शक राजू मुरगन
– सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाः दशक्रिया
– सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिक्शन फिल्म ‘अब्बा’
– विशेष उल्लेखनीय पुरस्कारः नीरजा- सोनम कपूर, कडवी हवा, मुक्ती भवन- आदिल
– एज्युकेशनल फिल्मः वॉटर फॉल
– उत्तर प्रदेशला ‘फिल्म फ्रेंडली’ राज्याचा पुरस्कार