भारतात गरज २२ लाख नेत्रदात्यांची!

साठ वर्षीय विठ्ठल बोराडे यांनी औरंगाबादहून आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी ते मुंबईतील जे.जे. हॉस्पीटल गाठलंय. लवकरच त्यांना दिसू लागणार आहे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 7, 2013, 10:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
साठ वर्षीय विठ्ठल बोराडे यांनी औरंगाबादहून आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील जे.जे. हॉस्पीटल गाठलंय. लवकरच त्यांना दिसू लागणार आहे... एका दात्यानं केलेल्या नेत्रदानामुळेच हे शक्य झालंय. विठ्ठल बोराडेंप्रमाणे आज लोखो लोकांना दृष्टी मिळवण्यासाठी नेत्रदानाची गरज आहे.
विठ्ठल बोराडे यांच्या डाव्या डोळ्याला मार बसला आणि त्यात त्यांचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला. मात्र, आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या डोळ्यात नवं बुबुळ बसवलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा दिसू लागेल. एका नेत्र दात्यानं केलेल्या नेत्रदानामुळेच बोराडे यांना नव्यानं दृष्टी मिळणार आहे. नेत्रदानाला सर्वश्रेष्ठदान असं म्हटलं जातं. मात्र, आजही अवयवदानामध्ये सगळ्यात जास्त गरज आहे ती नेत्रदानाची. आज लोकांमध्ये नेत्रदाना संदर्भात जागृती निर्माण होत असली तरी अद्यापही नेत्रदानाची संख्या फार कमी आहे.
आजमितीला भारतात २२ लाख लोकांना नेत्रदात्यांची गरज आहे. महाराष्ट्रात हीच संख्या दोन लाखांवर आहे. महाराष्ट्रात दरवर्षी पाच ते सहा हजार लोकांचं मरणोत्तर नेत्रदान होतं. मात्र, त्यांपैकी केवळ ४० टक्केच बुबुळं उपयोगात येतात. समाजावर पसरलेला अंधश्रद्धेचा पगडा आणि नेत्रदानाविषयीच्या जनजागृतीचा आभावामुळे नेत्रदानाचं प्रमाण फारच कमी असल्याचं, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचं म्हणणं आहे.

नेत्रदान कसं होतं
एखाद्या व्यक्तिच्या निधनानंतर सहा तासांच्या आत तज्ज्ञांकडून त्याची बुबुळे काढली जातात.. आणि त्यांचा वापर नेत्रदानासाठी केला जातो.

कोणाला दृष्टी मिळू शकते आणि कोणाला नाही?
जन्मत: अंध असणारी मात्र डोळा चांगल्या स्थितीत असणारी आणि बुबुळं पांढऱ्या असणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तिच्या बुबुळं प्रत्यारोपणानंतर दृष्टी परत येऊ शकते. मात्र, जन्मत:च डोळा विकसित झाला नसेल किंवा डोळा लहान असेल अशा व्यक्तिला याचा फायदा होत नाही. तेव्हा आपण केलेल्या नेत्रदानामुळे कुणीतरी पुन्हा नव्यानं जग पाहू शकणार आहे, याची जाणीव होणं फार महत्त्वाचं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.