गोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...

यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. 

Updated: May 6, 2017, 08:31 AM IST
गोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...  title=

पणजी : यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. 

गोवा आणि दारू हे जणू समीकरणच बनले आहे. पण गोव्यातल्या सार्वजनिक ठिकाणी ही मद्यपानावर बंदी घालण्यात आलीय. यापुढे अशा कृत्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे समुद्र किनाऱ्यांवर दारू पिता येणार नाही.

याचा पहिला फटका कर्नाटकातून आलेल्या तीन जण तसंच दिल्ली आणि नागपूरच्या प्रत्येकी एक अशा सहा पर्यटकांना बसला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. 
  
सुमारे १४ लाख लोकसंख्या असणाऱ्या गोव्यात ११,००० बार आणि दारूची दुकानं आहेत. इथल्या समुद्र किनाऱ्यांवर तर दारू जणू वाहत असते. शिवाय इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात दारू स्वस्त मिळते. त्यामुळे इथं येणारे पर्यटक दुकानातून दारू खरेदी करून सार्वजनिक ठिकाणी अगदी उघड्यावर दारू पितात. 

दारूच्या मोकळ्या बाटल्या तिथंच टाकतात काहीजण दंगामस्ती करतात. काही वेळा हे पोलिसांसमोरच चालते. अतिथ्य शीलतेचा भाग म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावे लागत होते. मात्र, हे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी यावर आता कारवाई सुरु केलीय. अशा पर्यटकांवर भारतीय संविधान कलम ३४ नुसार कारवाई करण्यात येतेय.

पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई यापुढे सुरूच राहणार आहे, त्यामुळे यापुढे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यांना बार किंवा शॉपमध्ये बसूनच दारूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे.