मुंबई : आयुष्यात अनेक वेळा तुम्हाला पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीचा पैसा आधार म्हणून कामात येतो, मात्र आता 58 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पीएफ काढता येणार नाही. नोकरी सोडल्यानंतर पीएफ काढण्याचा तुमचा अधिकार आता संपुष्टात आला आहे.
नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला पीएफ हवा असेल तर तुमच्या हिश्शाची रक्कम तुम्हाला मिळणार आहे, ती जमा रकमेच्या पन्नास टक्के असेल. मात्र उर्वरित 50 टक्के रकमेसाठी तुम्हाला वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या 1952 च्या कायद्यातील तरतुदींमध्ये हा बदल करण्यात आला आहे. देशभरात हा बदल गुरुवारपासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सुमारे 11 कोटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढण्यावर मर्यादा येणार आहे.
नोकरी सोडून व्यवसाय करू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यामुळे मोठी अडचण होणार आहे.
शासकीय, निमशासकीय अथवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा 12 टक्के 'पीएफ' रक्कम कापून घेतली जाते. तेवढीच रक्कम कंपनीकडून संबंधित कर्मचाऱ्याच्या 'पीएफ' खात्यात जमा केली जाते. परिणामी संबंधित कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर म्हातारपणी त्यांना जगण्यासाठी त्याचा आधार म्हणून उपयोग होतो.
मात्र, नोकरी दरम्यानच्या काळात शिक्षण, घरकर्ज अथवा अन्य काही मोजक्या कारणांसाठी ही रक्कम काढण्याची सुविधा कायद्याने कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. केंद्र सरकारकडून ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.
मात्र निवृत्तीपूर्वीच नोकरी सोडणाऱ्या अथवा संस्था-कंपनी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या संस्थेतील जमा झालेली 'पीएफ'ची रक्कम काढण्याची तरतूद या कायद्यात होती. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांत अर्ज केल्यानंतर जमा झालेली संपूर्ण रक्कम - कंपनी आणि कर्मचाऱ्याच्या हिश्श्याची अशी संपूर्ण रक्कम मिळत होती. अथवा एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत नोकरी लागल्यानंतर पूर्वीची 'पीएफ' रक्कम ट्रान्स्फर करून नव्या नोकरीच्या ठिकाणी करून घेण्याची सुविधा आहे.
'पीएफ'ची रक्कम हस्तांतरित करण्याची सुविधा सरकारकडून कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, नोकरी सोडल्यानंतर दुसऱ्या कंपनीत अथवा कुठेही नोकरी न करता 'पीएफ'ची रक्कम काढणे नव्या तरतुदीनुसार शक्य होणार नाही. ती रक्कम 58 वर्षांनंतरच मिळणार आहे,
परंतु, त्यापूर्वी जर काढावयाची झाल्यास पन्नास टक्के रक्कम म्हणजे स्वत:च्या हिश्शाची रक्कम काढता येणार आहे. उर्वरित रक्कम काढण्यासाठी वयाची 58 वर्ष होत नाही, तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यापूर्वी वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण जमा झालेल्या 'पीएफ' रकमेच्या 80 टक्के रक्कम काढता येत होती. केंद्र सरकारकडून त्याही तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या तरतुदीनुसार आता ही सुविधा कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 'पीएफ'ची संपूर्ण रक्कम हातात मिळणार आहे. त्यामुळे देखील कर्मचारी अडचणीत आले आहेत.