अबब! रामपालच्या अटकेवर २६ कोटींचा खर्च!

वादग्रस्त स्वयंघोषित संत रामपाल याचा ठावठिकाणा शोधणं आणि त्याला अटक करणं याकरिता राबविलेल्या मोहिमेवर तब्बल २६ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली असल्याची आकडेवारी तीन राज्यांच्या सरकारांनी कोर्टासमोर सादर केली आहे. 

PTI | Updated: Nov 29, 2014, 08:15 AM IST
अबब! रामपालच्या अटकेवर २६ कोटींचा खर्च! title=

चंदीगड: वादग्रस्त स्वयंघोषित संत रामपाल याचा ठावठिकाणा शोधणं आणि त्याला अटक करणं याकरिता राबविलेल्या मोहिमेवर तब्बल २६ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली असल्याची आकडेवारी तीन राज्यांच्या सरकारांनी कोर्टासमोर सादर केली आहे. 

शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात रामपालला न्या. एम. जयपॉल आणि न्या. दर्शन सिंग यांच्या खंडपीठासमोर उभं करण्यात आलं. कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी २३ डिसेंबर्पयत स्थगित केली आहे. त्या दिवशी रामपालसह सहआरोपी असलेले रामपाल ढाका आणि ओ.पी. हुडा यांनाही हजर केलं जाईल.

हरियाणाचे पोलीस महासंचालक एस.एन. वशिष्ठ यांनी रामपालच्या अटकेबाबतचा सविस्तर अहवालही न्यायालयाला सादर केला. याप्रकरणी हरियाणा, पंजाब, चंदीगड प्रशासन आणि केंद्र सरकारनं रामपालला पकडण्यासाठी राबविलेल्या मोहिमेवर झालेल्या खर्चाचा हिशोबही कोर्टासमोर ठेवला. यात हरियाणा सरकारचे १५.४३ कोटी, पंजाब सरकारचे ४.३४ कोटी, चंदीगड प्रशासनाचे ३.२९ कोटी, तर केंद्राचे ३.५५ कोटी रुपये खर्च झालेत.

कोर्टानं हरियाणा पोलीस महासंचालकांना जखमींचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, तसंच रामपालला अटक करण्याच्या दरम्यान बरवालाच्या सतलोक आश्रमात झालेल्या हिंसक घटनांमध्ये अटक झालेल्या लोकांच्या माहितीची शहानिशा करण्यासही सांगितलं आहे.

रामपालचे समर्थक आणि पोलीस यांच्यादरम्यान दोन आठवडे चाललेल्या या संघर्षानंतर १९ नोव्हेंबर रोजी ६३ वर्षाच्या रामपालला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेपूर्वी त्याच्या १५ हजार समर्थकांना आश्रमातून बाहेर काढावं लागलं होतं. या चकमकीत पाच स्त्रिया आणि एका बालकाचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.