www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`देशातील भ्रष्टाचार अल्पसंख्याकांसाठी एक वरदानच आहे, असं उपहासात्मक वक्तव्य शाही ईमाम बुखारी यांनी केलं आहे.
`देशातील भ्रष्टाचार अल्पसंख्याकांसाठी एक वरदानच आहे, देशातील भ्रष्टाचार आणखी शंभर वर्षे तरी संपणार नाही. मुसलमानांची कामं भ्रष्टाचार केल्याशिवाय आणि लाच दिल्याशिवायकामं होऊच शकत नाहीत,` असं वक्तव्य जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी यांनी केले आहे.
मुस्लिम उलेमांच्या बैठकीनंतर बुखारी यांनी आपली भूमिका मांडली. ही बैठक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली आहे.
तसेच `येत्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा हे ठरविण्यासाठी अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर याविषयीचा निर्णय घेतला जाईल,` असे बुखारींनी स्पष्ट केलं आहे.
मात्र, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, असंही बुखारी यांनी म्हटलं आहे.
भ्रष्टाचार नाही धर्मांधता मुद्दा
`भ्रष्टाचार नाही तर, धर्मांधता हीच देशातील सर्वात मोठी समस्या आहे. असं सांगून `आप`चा पर्याय बुखारींनी धुकावून लावला आहे. धर्मांधतेमुळे लोकांमध्ये वेगळेपणाची भावना वाढत आहे.
मात्र, या प्रश्नावर आपची भूमिका संशयास्पद आहे. `आप`ने हाती घेतलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा हा देशातला खरा प्रश्न नाहीच; उलट भ्रष्टाचार हे अल्पसंख्याकांसाठी कामं करून घेण्याचं साधन आहे,` असं बुखारींनी स्पष्टपणे सांगितलं.
काँग्रेसने मुसलमानांना फक्त जखमा दिल्या
बुखारी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका करायला विसरले नाहीत, `मुसलमानांनी गेली ६५ वर्षे काँग्रेसला पाठिंबा दिला. त्या बदल्यात काँग्रेसने मुसलमानांना शेकडो जखमा दिल्या. अल्पसंख्याकांच्या मागासलेपणाला काँग्रेसच जबाबदार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
दंगली बाबत सपा आणि भाजपची हातमिळवणी
`उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने मुसलमानांना दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत. याउलट सपाच्या कार्यकाळात तब्बल १०० दंगली झाल्या, असं सांगून त्यांनी समाजवादी पक्षांवरही टीकेची झोड उठवली.
मुझफ्फरनगर दंगलीतील सपाची वादग्रस्त भूमिका चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून या दंगलीची सीबीआय चौकशीही करण्यात आली नाही. सपा आणि भाजपने हातमिळवणी केली आहे,` असा आरोपही त्यांनी केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.