मुंबई : अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.
गुरुवारी, कच्च्या तेलाच्या किंमती ४९ डॉलर प्रति बॅरलवर येऊन पोहचल्यात. गेल्या चार आठवड्यांतील ही सर्वात कमी किंमत असल्याचं सांगितलं जातंय.
उल्लेखनीय म्हणजे, ईराकनं भविष्यात कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. कच्चा तेल स्वस्त झाल्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या तेल मार्केटिंग कंपन्यांच्या पंधरवड्याच्या समिक्षेदरम्यान पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात 'रुपया'चीही किंमत वधारलेली दिसतेय. एका वर्षात ५.५ टक्क्यांनी वाढून रुपया ६४.१५ वर आहे. यामुळे भारतात कच्च्या तेलाची आयात आणखी स्वस्त होईल... त्याचा परिणाम म्हणून कच्चं तेल स्वस्त होईल, असाही अंदाज व्यक्त केला जातोय.