अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गांधीनगरमध्ये प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आज सकाळी दहा वाजता औपचारिक उद्घाटन केलं. या संमेलनात 58 हून अधिक देशांतून भारतीय वंशाच्या लोकांनी सहभाग नोंदवलाय.
उल्लेखनीय म्हणजे, गुजरातनजिकच्या अरबी समुद्रातील भागात बोटीत झालेल्या स्फोटानंतर इथं सुरक्षा वाढविण्यात आलीय. तीन दिवसांचं हे संमेलन परदेशांत राहणाऱ्या भारतीयांचं भारताच्या विकासातील योगदानं अधोरेखित करतंय. भारतवंशीय लोकांशी जोडणं विशेषत: त्यांचं ज्ञान आणि कौशल्य एकाच मंचावर आणणं हा या संमेलनामागचा मूळ हेतू आहे. भारत सरकारच्या प्रवासी भारतीय प्रकरणांतील मंत्रालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय.
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या देशात परतण्याच्या घटनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहे. ते 9 जानेवारी, 1915 मध्ये भारतात परतले होते.
प्रवासी भारतीय दिवस 7 ते 9 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलंय. तर व्हायब्रंट गुजरात समिटचं आयोजन महात्मा मंदिरात 11 ते 13 जानेवारी दरम्यान करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.