जीव वाचण्यासाठी डीआयजी शिटी वाजवत होते...

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीएसएफचे डीआयजी एमएस चौहान यांची इनोव्हा गाडी नदीत 500 मीटरपर्यंत वाहून गेली. पाण्याचा वेग एवढा होता की, प्रवाहात डीआयजी साहेबांची गाडी 500 मीटरपर्यंत वाहून गेली. 

Updated: Sep 11, 2014, 04:22 PM IST
जीव वाचण्यासाठी डीआयजी शिटी वाजवत होते... title=

जोधपूर : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीएसएफचे डीआयजी एमएस चौहान यांची इनोव्हा गाडी नदीत 500 मीटरपर्यंत वाहून गेली. पाण्याचा वेग एवढा होता की, प्रवाहात डीआयजी साहेबांची गाडी 500 मीटरपर्यंत वाहून गेली. 

बीएसएफचे जवान आणि गावातील लोकांनी मिळून दोन तास प्रयत्न केले, तेव्हा डीआयजी साहेबांना वाचवण्यात यश आलं. या दरम्यान डीआयजी आपल्या ड्रायव्हरसोबत दोन तासांपासून गाडीच्या छतावर बसले होते.

डीआयजी चौहान दईजर जवळच्या बीएसएफ फायरिंग रेंजपासून ड्रायव्हर ललित कुमारसोबत घरी परतत होते. मात्र जोरदार पावसामुळे रस्त्यावर तीन-चार फूट पाणी वाहू लागलं. इनोव्हाच्या पुढे बीएसएफचीच एक बोलेरो गाडी चालली होती. 

मात्र इनोव्हा जेव्हा रेल्वेलाईन पास करत होती तेव्हा, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे गाडी दुसऱ्या दिशेला फिरली. ही गाडी थेट जवळच वाहणाऱ्या नाल्यात गेली. ही गाडी 500 किलोमीटरपर्यंत वाहत गेली मात्र एका मोठ्या दगडाचा धक्का लागल्याने ही गाडी तेथेच अडकली.

यावेळी डीआयजी आणि त्यांचा ड्रायव्हर गाडीत होता, तेव्हा ते कसंतरी करून गाडीच्या छतावर आले, डीआयजींना पोहोता येत नव्हतं, ड्रायव्हर ललितला पोहता येत होतं, पण पाण्याचा वेग जास्त असल्याने तो देखिल गाडीच्या छतावर जाऊन बसला.

यानंतर डीआयजींनी आपल्या खिशातील शिटी काढली आणि वाजवायला सुरूवात केली. यानंतर आयजी पीसी मीणा यांना कॉल करून डीआयजी अडकल्याची माहिती देण्यात आली. यानंतर बीएसएफची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि उपस्थित लोकांच्या मदतीने डीआयजी चौहान आणि त्यांच्या ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं. गाडीला पाण्यातून काढण्यासाठी क्रेनचीही मदत घ्यावी लागली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.