www.24taas.com, बंगळुरू
बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिलेला आहे की, नाही असाच प्रश्न सामान्यांना पडलेला आहे. पण पोलिसच बलात्काऱ्यांना पाठिशी घालत असल्याचे कर्नाटक हायकोर्टाने सांगितले आहे.
राज्य कुठलेही असो, पोलीस बलात्कार्यांनाच साथ देतात असे सांगतानाच जोपर्यंत स्वत:च्या घरच्यांवर असा प्रसंग ओढवत नाही तोपर्यंत त्यांचे डोळे उघडणार नाहीत, अशा शब्दांत कर्नाटक उच्च न्यायालयाने पोलिसांच्या वर्तनावर संताप व्यक्त केला आहे.
सय्यद करीम यांनी आपल्या मुलीवर बलात्कार करणार्या नराधमांची नावेही पोलिसांना सांगितली, पण त्यांनी गुन्हा नोंदविण्याचीही तसदी घेतली नाही. उलट पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर करीम यांच्यावरच तीनवेळा हल्ला करण्यात आला, असे त्यांचे वकील विजयकुमार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावरून खंडपीठाचा संताप अनावर झाला. महिलांविषयी सहानुभूती नावाचा प्रकारच शिल्लक राहिलेला नाही. पोलीस हे गुंडांना, गुन्हेगारांनाच साथ देत असल्याचे चित्र देशात सर्वत्र दिसते, असे मुख्य न्यायाधीश सेन म्हणाले. कर्नाटकात गेल्या महिन्यात एकाच आठवड्यात एका कॉलेज विद्यार्थिनीसह आठ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या.