www.24taas.com, नवी दिल्ली
राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय अण्णा हजारेंचा होता, असा दावा टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केलाय. अण्णांनी जर सांगितलं तर आम्ही माघार घ्यायला तयार असल्याचंही केजरीवालांनी ट्विटरवर सांगितलंय.
एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार अण्णा हजारे टीम अण्णाने पक्ष काढण्याच्या विरोधात होते. ३ ऑगस्टला घोषणा करण्यापूर्वी त्यांनी सदस्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता, भारतीय जनता यासाठी तयार नसल्याचं अण्णांचं मत होतं, त्यासाठी त्यांनी महात्मा गांधींच्या एका भाषणाची प्रतही सगळ्यांना वाटली होती. मात्र, आता अरविंद केजरीवाल यांनी हे दावे फेटाळून लावत पक्ष काढण्याचा निर्णय अण्णांनीच घेतला होता असं ट्वीट केलंय.
तर अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी जे कार्यकर्ते राजकीय पक्षात जाऊ इच्छितात त्यांनी पक्षाचं कार्य करावं आणि ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचंय त्यांनी आंदोलनाद्वारे लढा द्यावा, अशी भूमिका अण्णांनी मांडली होती, असं स्पष्टीकरण दिलंय.