www.24taas.com, नवी दिल्ली
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर बाबा रामदेव आक्रमक झाले आहेत. संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कारवाई करा, अशी मुदतच त्यांनी पंतप्रधानांना दिलीय. पंतप्रधान इमानदार असतील तर कारवा होईल अन्यथा उद्यापासून जनक्रांती होईल, असं वक्तव्य बाबांनी केलंय.
बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. पहिल्या दिवशी कारवाईसाठी त्यांनी सरकारला तीन दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही याबाबत पत्र लिहिलंय. सरकार स्वत:च्या हातानी पायावर कुऱ्हाड मारुन घेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काळ्या पैशांच्या मुद्द्यावर सरकारने आश्वासन मोडल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
दिल्लीत रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांच्या आंदोलनात अण्णा हजारे यांनी उपस्थिती लावली नसली, तरी अण्णांच्या सहकारी किरण बेदी या मात्र आज बाबांच्या स्टेजवर हजर झाल्या. बाबा रामदेव आणि अण्णांनी पुकारलेल्या या आंदोलनाला सर्वांनीच पाठिंबा देणं आवश्यक असल्याचं मत किरण बेदींनी व्यक्त केलं. अनेक भ्रष्ट नेत्यांनी परदेशात काळा पैसा गुंतवलाय. त्यामुळे यापुढे सरकारचा कारभार समजून घेण्यासाठी सर्वसामान्य माणसांनीही सरकार आणि त्यातील प्रशासनावर पोलिसांसारखीच करडी नजर ठेवली पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.