कानपूर : सार्वजनिक रुग्णालयात रुग्णाच्या आयुष्याशी कशा पद्धतीनं खेळलं जातं, याचं एक ढळढळीत उदाहरणच कानपूरमध्ये पाहायला मिळालं.
कानपूर जिल्हा रु्ग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत एक महिला दाखल झाली होती. रुग्णालयाच्या वार्डबाहेर ही महिला वेदनेनं विव्हळत, किंचाळत होती. पण, तिच्याकडे लक्ष द्यायलाही कुणाला वेळ नव्हतं... ड्यूटीवरील एकही डॉक्टर तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हता.
नातेवाईकांनी डॉक्टरांना उपचारासाठी विनंती केल्यावर तर महिलेच्या नातेवाईकांकडे 'सहा हजार रुपये द्या.... तरच उपचार सुरू होतील' अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे, पैसे भरण्यासाठी असक्षम असलेल्या या महिलेवर उपचार सुरू झाले नाहीत. सरकारी डॉक्टरांनी या रूग्णालयाला खाजगी दवाखाना बनवल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. जर पैसे असतील तरच इथे उपचार केले जातात, असंही त्यांचं म्हणणं आहे.
हा सगळा प्रकार मात्र कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर सगळं चित्र पालटायला सुरूवात झाली. माध्यमांचे कॅमेरे दिसताच महिलेला स्ट्रेचरवर झोपवून उपचार सुरू झाले. पण उपचाराच्या नावाखाली जे सुरू झालं ते तर आणखीन भयानक होतं... कारण, वॉर्डबॉयचं डॉक्टरांच्या भूमिकेत शिरला होता... तोच इथं सर्जन होता, तोच फिजिशिअन... तोच नर्स आणि तोच कंपाऊंडरही होता.
महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकाराची वरिष्ठ डॉक्टरांना किंचितही कल्पना नव्हती. सरकारी रुग्णालयातला हा सगळा प्रकार आपली आरोग्य व्यवस्था किती ढासळलीय हे दाखवण्यासाठी पुरेसा होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.