हिंसक `भारत बंद`... नेत्याची हत्या

‘भारत बंद’ आंदोलनानं पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतलंय. दोन दिवसांच्या या आंदोलनात आज दिल्लीनजीकच्या अंबाला भागात एका ट्रेड युनियन नेत्याची भरदिवसा डेपोमध्येच हत्या झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 20, 2013, 02:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘भारत बंद’ आंदोलनानं पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतलंय. दोन दिवसांच्या या आंदोलनात आज दिल्लीनजीकच्या अंबाला भागात एका ट्रेड युनियन नेत्याची भरदिवसा डेपोमध्येच हत्या झालीय.
हरियाणा रोडवेज श्रमिक संघाचे जिल्हा अध्यक्ष इंदर सिंह भडाना यांच्या म्हणण्यानुसार, आज पहाटे चार वाजता ही घटना घडलीय. आंदोलनकर्त्यांमध्ये सामील असलेल्या बस चालक नरेंद्र सिंह यानं अंबाला डेपोच्या बाहेर निघालेल्या एका बसला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, बस प्रशासनानं जबरदस्तीनं ही बस पुढे नेली आणि या झटापटीत नरेंद्र सिंह याला बसचा धक्का लागला. त्यामुळे त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. सिंह हे एआयटीयूसी संघटनेचे कोषाध्यक्षही होते.
तर, आज सकाळीच ‘एआयटीयूसी’चे महासचिव गुरुदास दासगुप्ता यांनी ‘नरेंद्र सिंह यांची हत्या अज्ञात लोकांनी चाकू भोसकून केल्याचं’ म्हटलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर अन्य आंदोलनकर्त्यांनीही हिंसेचा मार्ग स्वीकारला. या प्रकरणी भडाना यांनी रोजवेजच्या महाप्रबंधकांविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी केलीय. खटला दाखल झाल्याशिवाय सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी धमकीही त्यांनी यावेळी दिलीय. तणावाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी डेपो आणि जवळच्या भागांत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात केलेत.

दरम्यान, कामगारांच्या संपाचा देशभरात परिणाम जाणवू लागलाय. दिल्ली, कोलकाता, पाटणा, भुवनेश्वर आणि हैदराबाद शहरांमध्ये खास परिणाम जाणवतोय. पाटण्यात डाव्या संघटनांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. शिवाय़ प्रवासी वाहतूकही जबरदस्तीनं बंद पाडली. भुवनेश्वरमध्ये रेल रोको करण्यात आला. तर हैदराबादमध्ये सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेतली दुकानं बंद होती. कोलकात्यातल्या जनजीवनावरही बंदचा परिणाम जाणवतोय. एकंदर डाव्या पक्षांचा प्रभाव असलेल्या राज्यांत बंदचा मोठा प्रभाव जाणवतोय. देशभरातल्या बँका बंद राहणार असल्यानं आर्थिक व्यवहार ठप्प झालेत.