www.24taas.com, नवी दिल्ली
एका इंग्रजी वर्तमानपत्रानं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाना साधलाय. या वर्तमान पत्रानं राहुल गांधीच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करत असतानाच ब्रिटनमधल्या ‘द इकॉनॉमिस्ट’ या वर्तमानपत्रानं ‘द राहुल प्रॉब्लेम’ अशा नावाचा लेख प्रसिद्ध करून राहुल गांधी आणि त्यांना पंतप्रधानपदी पाहणा-यांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. या लेखात राहुल गांधी यांना कन्फ्यूज्ड (गोंधळलेला) आणि नॉन सिरियस (गंभीरता नसलेला) नेता म्हणून हिणवलंय. या लेखाची सुरुवात करतानाच, ‘राहुल गांधी यांचं लक्ष्य काय आहे? राहुल गांधी यांची कर्तृत्व काय आहे? त्यांच्याकडे काय काय करण्याची क्षमता आहे? हे कुणालाही माहित नाही. इतकंच नाही तर खुद्द राहुल गांधी यांनादेखील माहित नाही की सत्ता आणि जबाबदा-या हातात आल्यानंतर ते काय करणार आहेत’ असं या वर्तमानपत्रात म्हटलं गेलंय.
काँग्रेसचा प्रत्येक नेता राहुल गांधींची जाहिरात करण्यात व्यस्त आहे. राहुलला त्याची आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं उत्तराधिकारी मानण्यात येतंय. पण, यासाठी २०१४ चा निवडणूक प्रचार सुरू होण्याअगोदर त्यांना आपली योग्यता सिद्ध करून दाखवावी लागेल, असं या वर्तमानपत्राला वाटतंय.
गांधीवादी नेते अण्णा हजारे जेव्हा दिल्लीत उपोषणाला बसले होते त्यादरम्यान सोनिया गांधी उपचारासाठी विदेशात होत्या. यावेळी राहुल गांधींकडे स्वत:ला सिद्ध करण्याची योग्य वेळ होती. पण त्यांनी ती गमावली, असंही या लेखात म्हटलं गेलंय.