नवी दिल्ली : या महिन्यात रेल्वे मंत्रालयाने आणलेल्या नव्या रेल्वेच्या डब्यांची सर्वत्र फार चर्चा झाली. आकर्षक रंगसंगतीसोबत अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त हे नवीन डबे रेल्वेच्या बदलत्या रुपाचे प्रतिक ठरलं होतं.
पण, सरकारने कितीही सुविधा दिल्या तरी नागरिकांनी त्यांचा गैरवापर केला तर काय होते याचा प्रत्यय नुकताच आला. २२ जानेवारीला पंतप्रधानांनी झेंडा दाखवून सुरू केलेल्या वाराणसी - दिल्ली 'महामाना एक्सप्रेस'ला हे नवीन कोच दिले गेले होते.
पण, सुरू झाल्यापासून अगदी दुसऱ्या फेरीतच या गाडीतील नळ आणि प्रसाधनगृहीतील काही वस्तू चक्क चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
गुरुवारी ही ट्रेन जेव्हा दिल्लीतून वाराणसीला आली त्यानंतर ती यार्डात स्वच्छतेसाठी नेण्यात आली. तेव्हा हा सर्व प्रकार लक्षात आला.
जनरल डब्याच्या प्रसाधन गृहातील काही नळ, सोप किट आणि अन्य काही वस्तू चोरीला गेल्याचे समजले. रेल्वे पोलिसांनी आता यासंदर्भात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.