www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
राजकारणात काय चालतं, याचे दाखले निवडणून आलेले लोकप्रतिनिधी देत आहे. खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्यावरून बरेच वादळ उठले. आता तर केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्याच नेत्यांने खासदारकी १०० कोटी रूपयात मिळते, अशी धक्कादायक कबुली दिली.
आधीच युपीए सरकार अनेक गैरव्यवहामुळे अडचणीत सापडले आहे. अनेक घोटाळे पुढे आलेत. वाढती महागाईमुळे काँग्रेसवर टीका होत आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी राजकीय जेवणावळ उठली. काँग्रेस नेते राज बब्बर यांनी १२ रूपयात पोटभर जेवण मुंबईत मिळते म्हणून गरिबांच्या जखमेवर मीठ चोळले. रशीद मसूद यांनी तर कहर केला. ५ रूपयातही माणूस जेवू शकतो. तर यावर कडी करत फारूख अब्दुला यांनी १ रूपयांत पोटभर जेवू शकतो, असे विधान करून राजकीची निती दाखवून दिली. आता तर काँग्रेसचे नेते खासदार बिरेंद्र सिंग यांनी पैसे मोजले की, खासदारकी मिळते असे म्हटलंय. १०० कोटी रूपये मोजले की खासदारकी पदरात पडते, असा गौप्यस्फोट केला.
काँग्रेसला हा घरचा आहेर दिल्याने काँग्रेसच्या डोकेदुखी अधिकच भर पडली आहे. बिरेंद्र सिंग यांनी१०० कोटी रुपये देऊन काँग्रेसची राज्यसभेची खासदारकीही मिळवता येते, असं जाहीर वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पदं विकली जात असल्याचं यातून आता पुढे येत आहे.
काँग्रेसविरोधात बिरेंद्र सिंग यांनी उघड बंड पुकारल्याचे दिसत आहे. आपल्याला रेल्वे मंत्रालय मिळणार, हे जवळपास निश्चित झालं होतं. पण ऐनवेळी आपला पत्ता कापण्यात आला, असा हल्लाबोल युपीए सरकावर केलाय. काँग्रेसला १०० कोटी दिल्यावर राज्यसभेची खासदारकी मिळते. मात्र, राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी आपलं बजेट १०० कोटींचे होते. परंतु ८० कोटी रूपयांत काम झालं. त्यामुळे २० कोटी वाचले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
बिरेंद्र सिंग यांच्या आरोपामुळे विरोधकांना नविन मुद्दा हाती सापडला आहे. याबाबत भाजपने टीका केलेय. काँग्रेस हे भ्रष्टाचाराचं मूळ आहे. त्यातच पक्ष बुडाला, हेच चौधरी यांच्या विधानावरून स्पष्ट होते, अशी टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
दरम्यान, अडचणीत सापडलेल्या काँग्रेसने तात्काळ सारवासारव केली आहे. एखाद्याची कामगिरीवरून राज्यसभेवर उमेदवाराची निवड होते. काहीजण लाखभर रूपये देऊ शकत नाहीत, ते १०० कोटी रूपये देणार, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलाय. बिरेंद्र सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.