नवी दिल्ली : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओवर जोरदार हल्लाबोल केला. RTO हे चंबळच्या खोर्यातील डाकूंपेक्षा भयानक असल्याचे मत नोंदविले. येथे खूपच भ्रष्टाचार फोफावलाय, असे ते म्हणालेत.
आरटीओ विभाग हा देशात सर्वाधिक भ्रष्ट असून त्यांनी चालवलेली लूट ही चंबळच्या खोर्यातील डाकूंनाही मागे टाकणारी आहे, असे गडकरी म्हणालेत. ते हिंदी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या ‘जागरण फोरम’मध्ये बोलत होते. वाहतूक विभागातील हितसंबंधित संगणकीकरणाला आणि पारदर्शकतेला विरोध करत आहेत, असे सांगतानाच रस्ते वाहतूक सुरक्षितता विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील आरटीओ अधिकारीच मंत्र्यांना चिथावत आहेत असा आरोपही गडकरी यांनी केला.
वाहतुकीचे नियम धुडकावल्याने घडलेल्या अपघातात बालकाचा बळी गेला तर वाहनचालकाला ३ लाख रुपयांच्या दंडासहीत ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद रस्ते वाहतूक आणि सुरक्षितता विधेयकात केली आहे.
वाहन चालवण्याचा परवाना भारतात सहजगत्या जगात कुठेही मिळत नाही. त्यामुळेच आजघडीला तीस टक्के वाहनचालकांचे परवाने ‘बोगस’ आहेत हे सांगताना मला अपराधीपणाचे वाटते, असेही ते म्हणाले. रस्ते वाहतूक आणि सुरक्षितता विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल, असा ठाम विश्वास गडकरी यांनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.