खासदार सचिन तेंडुलकर शून्यावर ‘आऊट’

मैदानात तुफानी पराक्रम गाजवणारा सचिन तेंडुलकर खासदार म्हणून मात्र टीकेचा धनी होतोय. या वर्षभरात सचिन तेंडुलकरने संसदेत एकदाही उपस्थिती लावलेली नाही. 

Updated: Aug 8, 2014, 09:39 AM IST
खासदार सचिन तेंडुलकर शून्यावर ‘आऊट’  title=
खासदार सचिन आणि रेखा

नवी दिल्ली : मैदानात तुफानी पराक्रम गाजवणारा सचिन तेंडुलकर खासदार म्हणून मात्र टीकेचा धनी होतोय. या वर्षभरात सचिन तेंडुलकरने संसदेत एकदाही उपस्थिती लावलेली नाही. 

खासदार म्हणून सचिनचा रेकॉर्ड खूपच खराब आहे... मास्टर ब्लास्टरनं यंदाच्या वर्षात संसदेत आपलं खातंही उघडलेलं नाही. संसदेच्या रेकॉर्डसनुसार सचिन यावर्षभरात एकदाही संसदेत आलेला नाही. खासदार रेखानंही संसदेत फारसा उत्साह दाखवलेला नाही. मैदानात बॅटने चाहत्यांना आश्वस्त करणारा सचिन या आश्वासनाबाबतीत मात्र ‘एलबीडब्ल्यू’ झालाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, सचिननं यंदाच्या वर्षात कही दिवस संसदेत पाऊल ठेवलेलं नाही. 44 वर्षीय क्रिकेटरकडून लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या. संसदेत खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सचिनकडून काहीतरी पावलं उचलले जातील, असं अनेकांना वाटत होतं. जून 2012 मध्ये सचिनला राज्यसभेचं सदस्यत्व प्रदान केलं होतं. गेल्या नोव्हेंबरमध्ये तो रिटायर झाल्यावर संसदेत जास्तवेळा दिसेल अशी अपेक्षा होती. पण, तो एकदाही आलेला नाही. 

रेकॉर्डनुसार, 2013मध्येही सचिननं केवळ 3 दिवस सत्रात भाग घेतला होता. इतकंच नाही तर कोणत्याही चर्चेमध्ये सचिननं साधा सहभागही घेतलेला नाही. ही माहिती ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च’कडून मिळालीय.  
  
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनीच सचिनला राज्यसभेत पाठवलंय आणि आता तेच नेते सचिनवर टीका करतायत. तर डाव्यांनी राजीनाम्याची मागणी केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.