अंदमान : अंदमान सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्तीचं भूमीपूजन करण्यात आलंय. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते हे भूमीपूजन झालं.
यावेळी बोलताना मराठी पर्यटकांना अंदमानला जाण्यासाठी विमानखर्चात सवलत मिळावी, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी केली. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आत्मसमर्पण दिवस आणि अंदमान तुरुंगात पहिल्यांदाच सावरकर आले तो ४ जुलै, या चार दिवशी मराठी पर्यटकांना अंदमानसाठीच्या विमानखर्चात सवलत देण्याची मागणी, शेवाळे यांनी केली. सोबतच येत्या ऑक्टॉबरमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमानमध्ये भरवलं जात आहे. या संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी, असं नावं देण्याची मागणीही शेवाळेंनी केली.
अंदमानमधल्या महाराष्ट्र मंडळाला आर्थिक सहाय्य करण्याचाही प्रस्ताव शेवाळेंनी ठेवला. तर देशासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस, सावरकर यांच्या नावे विशेष पदक दिलं जावं असं आवाहन, उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केंद्र सरकारला या निमित्तानं केलं.
युपीए सरकारच्या कार्यकाळात सावरकरांच्या काव्यपंक्ती हटवण्यात आल्या होत्या. तत्कालीन केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी त्या काव्यपंक्ती हटवल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.