पणजी : गोव्यात ब्रिटीश मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोघांची सबळ पुराव्याअभावी पणजीतील बाल न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. न्यायालयाच्या निकालावर स्कार्लेटच्या आईने तीव्र नाराजी दर्शवली आहे. माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गोवामध्ये २००८ मध्ये स्कार्लेट किलिंग या १५ वर्षांच्या ब्रिटीश मुलीचा अंजूना बीचवर अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. सुरुवातीला समुद्रात बुडून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आरोग्य तपासणी दरम्यान तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते.
गोवा पोलिसांनी योग्य तपास न केल्याने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सॅम्सन डिसोझा आणि प्लॅसिदो कार्व्हेलो या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनी स्कार्लेटला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केले आणि अत्याचारानंतर तिला बेशुद्धावस्थेत किनाऱ्यावरच सोडून दिले होते. त्यानंतर तिचा पाण्यान बुडून तिचा मृत्यू झाला.