`शशी थरुर माझ्या आईचा जीव घेऊ शकत नाहीत`

सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिव मेनन यानं दिलेल्या माहितीत, `आपली आई (सुनंदा पुष्कर) खूप धैर्यशील महिला होती. ती कधीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकत नाही` असं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 22, 2014, 09:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिव मेनन यानं दिलेल्या माहितीत, `आपली आई (सुनंदा पुष्कर) खूप धैर्यशील महिला होती. ती कधीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकत नाही` असं म्हटलंय. याचसोबत, शीवनं शशी थरूर हे आपल्या आईच्या मृत्यूसाठी कारणीभूत असतील, असंही आपल्याला वाटत नसल्याचं पोलिसांसमोर म्हटलंय.
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू कसा झाला असावा याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. याबद्दल शिवनं `माझी आई खूप कणखर महिला होती. ती कधीही आत्महत्या करू शकत नाही. जी व्यक्ती माझ्या आईला जवळून ओळखते ती हे सांगू शकते की माझी आई कधीही आत्महत्या करू शकत नाही... कारण, तिचं जीवनावर खूपच प्रेम होतं` असं म्हटलंय.
शिव हा सुनंदा आणि त्यांचे दुसरे पती सुजिथ मेनन यांचा मुलगा आहे. सुजिथ यांचा १९९७ साली रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर सुनंदा यांनी २०१० साली शशी थरुर यांच्यासोबत विवाह केला होता.
आपल्या आईच्या मुद्द्यावर शीवनं शशी थरुर यांचाही बचाव केलाय. `मला असं अजिबात वाटत नाहीए की ते (शशी थरूर) माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. शशि थरुर यांनी कधीही माझ्या आईला मारहाण केलेली नाही. त्यांचे एकमेकांसोबत थोडे मतभेद होते परंतु ते दोघेही एकमेकांवर नितांत प्रेम करत होते`.
दरम्यान, केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यू `विषा`मुळे झाल्याचं म्हटलंय. यानंतर दिल्ली पोलिसांना या रहस्यमय प्रकरणाच्या चौकशीत हत्या आणि आत्महत्या या दोन्ही संभव कारणांचा वेध घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. ५२ वर्षीय सुनंदा दक्षिण दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्यापूर्वी, त्यांचं ट्विटरवरून पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि शशी थरूर यांच्या कथित प्रेमसंबंधांवरून तरार यांच्याशी जोरदार भांडणही झालं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.