www.24taas.com, झी मीडिया, मुंबई/जालंधर
मूळ पंजाबचे सूफी गायक, पद्मश्रीप्राप्त हंसराज हंस यांनी पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारलाय, अशा आशयाच्या बातम्यांनी सध्या पाकिस्तानातील मीडियात जोर पकडलाय.
पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्याप्रमाणे हंसराज हंस यांनी आपल्याला लवकरात लवकर मदीनामध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केलीय. आता त्यांचं नाव मोहम्मद युसूफ असेल. परंतु, संगीत क्षेत्रात मात्र ते हंसराज हंस याच नावानं ओळखळे जातील.
याबद्दल, हंसराज यांचा मुलगा नवराज हंस यानं मात्र या सगळ्या बातम्या धादांत खोट्या असल्याचं म्हटलंय. नसराज यांनी असं काहीही केलेलं नाही, ते जालंधरमध्येच आहेत. पण, आजारी असल्यानं ते कोणाशीही संवाद साधू शकत नाहीत, असं नवराजनं म्हटलंय. नवराज यानं गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात गायक दलेर मेहंदी यांची मुलगी अजित हिच्याशी शीख परंपरेनुसार गुरुद्वारामध्ये लग्नगाठ बांधलीय.
जालंधरजवळ सफीपूर गावात जन्मलेल्या हंसराज यांनी लहान वयातच गायन सुरू केलं होतं. त्यांचे वडील सरदार रक्षपाल सिंह आणि आई सृजन कौर किंवा त्यांच्या आधीच्या कोणत्याही पिढीत संगीताचं साधं नावंही नव्हतं. अनेक यूथ फेस्टिव्हलमध्ये विजेता बनलेल्या हंसराज यांच्या गायनाचा प्रवास अनेक सिनेमे, म्युझिक इंडस्ट्री आणि राजकारणाच्या रस्त्यावरून झालाय.
सूफी संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या हंस यांना पंजाब सरकारनं `राज गायक` या उपाधीनं गौरविलंय. नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत `कच्चे धागे` या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणाऱ्या हंसराज यांनी नायक, ब्लॅक, बिच्छू अशा अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिलीत.
२००९ साली पंजाबच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीत मात मिळाल्यानंतर संगीत क्षेत्रच हंसराज यांना मुंबईकडे खेचून घेऊन गेलं. मुंबईतला प्रवासही त्यांना अकाली दलात सक्रीय होण्यासाठी कारणीभूत ठरला. याच पक्षासाठी त्यांनी अनेक दिवस कामही केलं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालंधरहून शिअदच्या तिकीटावर हंस यांची दावेदारी समजली जात होती. परंतु, त्यांच्याऐवजी मंगळवारी पवन टीनू यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं.
अशा परिस्थितीत हंसराज हंस यांनी इस्लाम कबूल केल्याच्या वृत्तामुळे राजकारणातील आणखी काही नवी समीकरणं तयार होण्याची चिन्हं आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.