www.24taas.com, चेन्नई
तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये बुधवारी फटाक्यांच्या एका खाजगी कारखान्यात लागलेल्या आगीत ३० जणांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ ७० जण गंभीर जखमी झालेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकाशीतल्या ‘ओम शिवशक्ती’ या फटाक्यांच्या कारखान्यात काम सुरू असताना अचानक ही घटना घडली. यावेळी कारखान्यात जवळजवळ ३०० कर्मचारी हजर होते. आग लागल्याबरोबर या सगळ्यांनी बाहेर धाव घेतली. पण, आतमध्ये अजून किती लोक अडकलेत याची मात्र पोलिसांना कोणतीही कल्पना देता येत नाही. फायर ब्रिगेडला ही सूचना मिळताच १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. या कारखान्यात काही बालकामगार अडकले असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवलीय. फटाक्यांच्या कारखान्यात ही घटना घडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही धोका निर्माण झालाय. इथं जवळजवळ २५० ते ३०० जण अडकल्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत सहा जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेत.
शिवकाशी हे ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके तयार करण्यात येतात. दिवाळी तोंडावर आली असताना इथल्या कारखान्यांत मोठ्या प्रमाणावर फटाके बनवण्याची कामं सुरू आहेत.