मुंबई, नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या खेरवाडी परिसरातही काँग्रेसच्यावतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार प्रिया दत्त यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. टायर पेटवून आणि प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केलाय. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्लीप्रमाणेच देशभरात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून राजकारण तापवण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय. मुंबईत वांद्रे इथं काँग्रेसनं निदर्शनं केलीत. आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येतंय. नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. आज सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय.
यादिवशी दोन्ही नेते कोर्टासमोर हजर राहतील. मात्र कोर्टानं जर जामीन घेण्यास सांगितलं, तर काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यासाठी अर्ज करणार नाही, असे संकेत पक्षातल्या सूत्रांनी दिलीय. त्यामुळे आज राजधानीत होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष आहे.
कडक सुरक्षा
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी पतियाला हाऊस कोर्टात हजर राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कोर्टाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. या हायप्रोफाइल खटल्याकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय. त्यामुळं कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांचीही मोठी गर्दी झालीय. दुसरीकडे यावरुन जोरदार राजकारणही सुरु आहे.
दिल्लीत पोस्टरबाजी
दिल्लीच्या तीन मूर्ती परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करुन भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांच्यावर हल्लाबोल केलाय.. नॅशनल हेराल्डमधल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी स्वामींनी कोर्टात याचिका दाखल केली होती.. पक्षाच्या निधीचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्यांनी या याचिकेतून केला होता..
नॅशनल हेराल्ड सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसोबतच देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येतंय. विविध शहरात काँग्रेसनं सरकारविरोधात आंदोलन केलंय. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसी, जयपूर, कानपूर, पाटणा, लखनऊ, बंगळुरु, कोइम्बतूर अशा शहरांमध्ये हे आंदोलन करण्यात येतंय.. यावेळी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.