गीता राष्ट्रीय धर्मग्रंथ नाही - सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टानं श्रीमदभगवत गीतेला राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यास नकार दिलाय. 

Updated: Mar 21, 2015, 03:49 PM IST
गीता राष्ट्रीय धर्मग्रंथ नाही - सुप्रीम कोर्ट  title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं श्रीमदभगवत गीतेला राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यास नकार दिलाय. 

मुख्य न्यायाधीश एच एल दत्तू यांनी बालकृष्णन या व्यावसायानं वकील असलेल्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावलीय. 

बालकृष्णन यांची याचिका दाखल करताना, गीतेचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे. तर ख्रिश्चन धर्माचा इतिहास केवळ दोन हजार वर्ष जुना असल्याचं म्हटलं होतं. तसंच इस्लामचाही इतिहास चौदासे वर्ष जुना असल्याचा त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच गीतेला कोणत्याही धर्माशी जोडून पाहता येणार नसल्याचं बालकृष्णन यांनी म्हटलं होतं. तसंच गीतेत सामाजिक आणि नैतिक मूल्यांवर महत्त्वपूर्ण शिक्षण दिलं गेलंय. त्यामुळे गीतेला राष्ट्रीय पुस्तक म्हणून घोषित करण्यात यावं, असंही त्यांचं म्हणणं होतं. 

तसंच, गीतेला शैक्षणिक संस्थेमध्येही सहभागी करण्यात यावं, यासंबंधी हरियाणा सरकारणंही राज्य स्तरावर काही निर्णय घेतले आहे, असं त्यांनी म्हटलं. परंतु, मुख्य न्यायाधीशांना निर्णय देताना आपण या प्रकरणात कोणतीही दखल देऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. 

हा लोकांच्या भावनांचा आणि आस्थेचा प्रश्न आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही पुस्तकाच्या आदर्शांचं पालन करू शकतो. त्यामध्ये, न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. 

यानंतर न्यायमूर्ती दत्तू यांनी गीतेच्या श्लोकाच्या 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या ओळींचं उच्चारण करताना याचिकाकर्त्यांना 'आता आपण आपलं काम केलंय... फळाची चिंता करू नये' असं म्हणत ही याचिका फेटाळून लावली.  
 
 
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.