चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करून आज वीस दिवस होत आहेत. २२ सप्टेंबरपासून त्या हॉस्पीटलमध्ये भरती आहेत.
जयललिता यांच्या प्रकृतीती सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण आता प्रकृती अस्वस्थ असल्यानं जयललितांकडे असणारी सर्व खाती आता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे जोपर्यंत जयललिता रुग्णालयातून बाहेर येत नाहीत, तोवर कॅबिनेटची बैठक बोलावण्याचे अधिकारही पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवण्यात आलेत.
तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मंगळवारी जयललिता यांच्याकडे असलेल्या सगळ्या विभागांची जबाबदारी अर्थमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवलेत. परंतु, अन्नाद्रमुख प्रमुखच मुख्यमंत्री राहतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जयललिता यांच्याकडे पोलीस, गृह आणि सामान्य प्रशासन यांच्यासहीत अनेक विभागांची जबाबदारी आहे.
तामिळनाडूच्या राज्यपालांनी याविषयी माहिती पत्रकर जारी केलंय. जयललितांच्या प्रकृती बद्दल जोरदार तर्कवितर्क सुरू असल्यानं या निर्णयाला अत्यंत महत्व प्राप्त झालंय.
ताप आणि डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर ६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.