www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ट्विटरवॉर रंगल्यानंतर मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशि थरूर यांनी आपल्या पत्नीसोबत एक खुलासा आता जाहीर केलाय. या खुलाशामध्ये, दोघांनीही `आम्ही नव्हे त्यातले...`ची भूमिका घेतलीय. या खुलाशात आपण दोघंही आमच्या वैवाहिक जीवनात खूश असल्याचा दावा त्यांनी केलाय. सोबतच `काही अनधिकृत ट्विटस`मुळे आपण हैराण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.
शशी थरुर यांच्या फेसबुक पेजवर सध्या हा खुलासा दिसतोय. `आमच्या ट्विटर अकाऊंटमधून काही अनधिकृत ट्विटसमुळे न शोभणाऱ्या वादात आपण अडकलो आहेत आणि त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत` असा खुलासा या जोडप्यानं केलाय.
एका पाकिस्तानी महिला पत्रकारानं शशी शरूर यांना पाठवलेल्या काही रोमान्टिक मॅसेजेस थरूर यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केले, आणि या वादाला सुरुवात झाली. ट्विटरवर थरुर यांच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे.
थरुर यांची पत्नी सुनंदा यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईटवर दावा केलाय की `कथित रुपात लाहौरची एक पत्रकार मेहर तरार हिनं थरुर यांना काही रोमान्टिक मॅसेज पाठवले होते. हेच मॅसेज आणि थरूर यांचा रंगीला अवतार लोकांसमोर यावा म्हणून आपणच थरूर यांच्या ट्विटर अकाऊंवरून पोस्ट केले होते. यामुळे ती माझ्या पतीच्या मागे कशी लागलीय हेही जगासमोर येईल.`
यानंतर, दिल्या गेलेल्या स्पष्टीकरणात मात्र वेगळाच सूर आवळलेला दिसतोय. `आम्ही एक खुशाल दाम्पत्य आहोत आणि आम्ही असंच जीवन जगू इच्छितो. सुनंदा सध्या आजारी आहे आणि याच आठवड्यात त्यांना हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलाय आणि तिला आराम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर ठेवा, त्यासाठी आम्ही मीडियाचे आभारी असू` असं त्यांनी या स्पष्टीकरणात म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.