नवी दिल्ली : तुमच्या रोजच्या जीवनात आवश्यक भाग बनलेल्या काही इलेक्ट्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. केंद्र सरकारने टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्र आदींसाठी दिलेली उत्पादन शुल्क सवलत मागे घेतल्याने या वस्तूही महागणार आहेत.
केंद्र सरकारने वाहनांवरील उत्पादन शुल्क सवलत मागे घेतल्यानंतर त्यांच्या किमतीत हजारो रुपयांनी वाढ झाली आहे. आता दैनंदिन जीवनात लागणा-या ग्राहकोपयोगी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्र आदींसाठी दिलेली उत्पादन शुल्काची सवलतही मागे घेतल्याने या वस्तूही महागणार आहेत. या वस्तूंच्या किमतीमध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे, अशी माहिती उत्पादक कंपन्यांनी दिली आहे.
हेअर इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रगांझा म्हणाले की, सरकारने उत्पादन शुल्कावरील सवलत मागे घेतल्याने वस्तूंची दरवाढ होणारच होती. आम्ही सर्वच वस्तूंच्या दरांमध्ये तीन ते पाच टक्के वाढ करणार आहोत.
गोदरेज अप्लायन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले की, आमच्या विविध उत्पादनांवरील वस्तूंच्या किमतींमध्ये तीन ते पाच टक्के वाढ करण्यात येणार आहे. सरकारने दोन टक्के उत्पादन शुल्क वाढवले असून डॉलर्सच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने वस्तूंच्या उत्पादन खर्चात वाढ झाली.
सरकारने उत्पादन शुल्कावरील सवलत रद्द केल्याने ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती महागणार आहेत. त्याचा मोठा परिणाम वस्तूंच्या खरेदीवर होणार आहे. त्यामुळे सरकारने सवलत कायम ठेवावी, अशी मागणी पॅनासोनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष शर्मा यांनी केली. पॅनासॉनिकने वातानुकूलित यंत्राच्या किमतीत तीन टक्के तर अन्य उत्पादनांच्या किमतीत दोन ते तीन टक्के वाढ केली.
डैकिन एअरकंडिशनिंग इंडियानेही आपल्या सर्वच उत्पादनांमध्ये सरासरी ४ टक्के वाढ करण्याचे ठरवले आहे. रुपया घसरल्याने आणि उत्पादन शुल्क वाढवल्याने आमचाही नाईलाज आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कंवलजीत जावा यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.